
ती आहे म्हणून हे विश्व आहे.
ती आहे म्हणून घराला घरपणं आहे.
ती आहे म्हणून नात्यातं जीवंतपणा आहे.
ती चा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
”महिलांनी स्वतःला कमी न लेखता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या टिकेला न जुमानता आपल्या कार्याला प्रगतीचे पंख लावावे” असे मत माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. प्रसंग होता चांदा पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्य आयोजीत केलेल्या मुलाखतीचा.
चांदा पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त आमदार प्रतिभाताई धानोरकर व त्यांच्या सासूबाई श्रीमती वत्सलाताई धानोरकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजीत केल्या गेला होता. या प्रसंगी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे हिरवे रोप देऊन स्वागत केले तर प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी मान्यवरांचा परीचय देऊन कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविक भाषणात मांडली.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्या महिला सक्षमीकरणाकरीता नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याला सक्षम असे नेतृत्त्व मिळाले आहे. परंतु स्त्रीला घराबाहेर पडतांना कुटुंबातील सदस्यांचे पाठबळ विशेष म्हणजे सुनेला सासूचा पाठिंबा व प्रोत्साहन मिळणे खूप गरजेचे असते. धानोरकर कुटुंबातील सासू-सुनेच्या नात्यावर आधारित तसेच युवापिढी व महिला सक्षमीकरण या विषयांवर मुलाखती दरम्यान सुसंवाद साधल्या गेला.
व्यासपिठावर उपस्थित मुख्य अतिथी वत्सलाताई धानोरकर व प्रमुख पाहूण्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुलाखत इश्वरी फरांडे व निधी शेंडे या विद्यार्थिनींनी घेतली.
कुटुंबाप्रती कर्तव्य, समाजकार्य, सामाजिक मानसिकता, नात्यांमधील सहसंबंध, महिलांच्या समस्या, युवा पिढीला संदेश इत्यादी विषयावर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी दिलखुलास बातचीत केली.
”मुलांनो तुम्हाला कशात रस आहे हे ओळखून आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा आणि नेत्रदिपक प्रगती करा.“ असा मोलाचा संदेश आमदार प्रतिभाताईनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. घर, कुटुंब, सामाजिक कार्य व राजकारण यांचा योग्य समन्वय साधून आपल्या वक्तृत्वशैलीची छाप पाडणा-या आमदार प्रतिभाताईंनी चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे, शिक्षकांचे तसेच शाळेचे कौतूक केले व भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन कार्यक्रम प्रमुख शिक्षिका रेवती बडकेलवार, रोशना हजारे, मनिषा नागोशे, महेश गौरकार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तन्वी धात्रक, पार्थ चौधरी व निहा चिवंडे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन इश्ना सहारे या विद्यार्थीनीने केले.



