
चंद्रपूर : तब्बल दहा वर्षांनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपुरात येत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या चाचपणीसाठी त्यांचा हा दौरा आहे. दोन दिवसीय या दौऱ्यात ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी ते संवादही साधणार आहे. त्यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. सोमवारी चार वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृहात त्यांचेआगमन होईल. येथे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. हॉटेल एनडी येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. 20 सप्टेंबरला चंद्रपूर शहरातील वकील, सीए, पर्यावरण अभ्यासक, साहित्यिक, उद्योजक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा करणार आहे. त्यानंतर सायंकाळी ते अमरावतीकडे निघणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक शहर कार्यालयात पार पडली. यावेळी संपर्क अध्यक्ष सचिन भोयर, मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मंजू लेडांगे, सुमित करपे, राहुल मडावी, क्रिष्णा सूरमवार, बाळा चंदनवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.




