चंद्रपुर

➤ राजुरा तालुक्यातील लहान मार्डा हे यादवकालीन गाव

➤ राजुरा तालुक्यातील लहान मार्डा हे यादवकालीन गाव

राजुरा तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेले लहान मार्डा हे गाव गोंडकालीन काळापेक्षाही प्राचीन असून येथे यादवकालीन शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती आणि वाघोबाची मूर्ती आढळून आली आहे, अशी माहिती पुरातत्त्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

या प्राचीन गाव परिसरात आजही मातीची भांडी, हांडे, मडकी, दगडी अवजारे, लोखंडी शस्त्रांचे अवशेष, प्राण्यांची हाडे, दात तसेच जुन्या पाषाणयुगीन मानवांनी वापरलेली साधने आढळत असल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी निवृत्त शिक्षक विजय टोंगे यांनी प्रा. चोपणे यांना इतिहास अभ्यासासाठी निमंत्रित केले होते. यावेळी दिलीप उरकुडे हेही उपस्थित होते. अभ्यासादरम्यान असे आढळून आले की, सुमारे ५०० वर्षांपूर्वीपासून कुणबी समाज या परिसरात वास्तव्यास होता. मात्र वर्धा नदीच्या पुरामुळे सुमारे ६५ वर्षांपूर्वी गावाचे स्थलांतर करून नवीन गाव वसविण्यात आले.

वर्धा नदीच्या उंच काठावर सुमारे ५०० वर्षांपूर्वी यादवकालीन गवळी समाजाचे गाव अस्तित्वात होते. त्यांनी तेथे उघड्या स्वरूपातील शिवमंदिराची स्थापना केली होती. मंदिरात मोठे शिवलिंग, शिव-पार्वती, गणपती तसेच विशेष म्हणजे वाघोबाची लहान मूर्ती स्थापित करण्यात आली होती.

सध्या याच ठिकाणी उरकुडे कुटुंबातर्फे दिलीप उरकुडे यांच्या पुढाकाराने या प्राचीन वास्तूंचे जतन, सामाजिक जनजागृती आणि लोकशिक्षणाच्या उद्देशाने भव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. गावापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी शासनाने रस्त्यालाही मंजुरी दिली आहे. यापूर्वीच महावितरणने सुमारे एक किलोमीटर वीजवाहिनी टाकून वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रा. चोपणे यांनी सांगितले की, वणी व राजुरा तालुक्यातील अनेक ठिकाणी २५ हजार ते ५ हजार वर्षांपूर्वी वास्तव्य करणाऱ्या मानवांनी वापरलेली दगडी अवजारे सापडली आहेत. या प्रदेशात गोंडकालीन काळापेक्षाही प्राचीन सातवाहन, वाकाटक आणि यादवकालीन वस्तीस्थळांचे अवशेष आढळतात. या सर्व स्थळांच्या संशोधनासाठी प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील नागरिकांनी जुन्या गावांची, मंदिरांची तसेच ऐतिहासिक स्थळांची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

— प्रा. सुरेश चोपणे
पुरातत्त्व संशोधक, चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published.