
प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा.सा.कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेला अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, कोरोनाचे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद्र किन्नाके तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विस्तार अधिकारी (आरोग्य), महानगरपालिकेचे वैद्यकीय, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना, जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे.
त्यामुळे सर्वांनी कोरोना संदर्भात खबरदारी व उपायोजना करणे महत्त्वपूर्ण आहे. तालुकास्तरावर कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाची आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा येऊ नये, यासाठी देखील प्रयत्न करावे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉरेंटाईन केंद्र स्थापन होणार आहे, असे देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, जिल्ह्याच्या तसेच प्रत्येक तहसील ठिकाणी कोरोना नियंत्रण कक्षाची देखील स्थापना केलेली आहे. शासकीय कार्यालयातील अभ्यांगतांच्या भेटी ३१ मार्चपर्यंत बंद असणारच आहे आणि कार्यालयातील वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे. जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपत्ती निधी तसेच आमदार निधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. ज्या कोरोना संशयित रुग्णांना होम कॉरेंटाईन करणार आहे.
अशा रुग्णांच्या बोटावर शाई सुद्धा लावण्यात येणार आहे. शासकीय सर्व बैठकी रद्द केल्या असून, फक्त आपत्कालीन बैठकी घेण्यात येणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी स्पष्ट केले. सर्वांनी मिळून कोरोना या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले. कोरोनाचे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी उपस्थित सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना सविस्तर कोरोना विषाणू याविषयी माहिती दिली. कोरोनाच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपायोजना व संशयित, बाधित रुग्ण आढळले तर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी तसेच अशा रुग्णांवर उपचार कसा करावा.
यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व कोरोना विषाणूचा प्रतिबंध व प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृती योजना तयार असावी. ज्या रुग्णांना ताप, खोकला, सर्दी असे लक्षणे आढळून आले. तर त्यांची सविस्तर नोंद ठेवावी. रुग्णांना कोरोना संदर्भात माहिती द्यावी व घाबरून न जाता जागरूक राहण्याचे आवाहन संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी आपापल्या क्षेत्रात करावे, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी यावेळी दिल्यात.


