चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त अस्थिकलश मिरवणूक

ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त रविवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची सकाळी ११. ३० वाजताच्या सुमारास भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. हजारो बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन करून ‘जयभीम’ चा नारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने फुलांनी सजविलेल्या रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश ठेवण्यात आले होते. ‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो’, अशा विविध घोषणा देत मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे जवान करीत होते. त्यांच्या मागे भारतीय बौद्ध महासभेचे उपासक व उपासिका रांगेमध्ये चालत होत्या. या मिरवणुकीत पांढरा गणवेश परिधान केलेले पुरूष, महिला व बालके सहभागी झाले होते. शहरातील विविध वार्डातील स्त्री-पुरूषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. पांढऱ्या गणवेशातील मिरवणूक शांततेचा संदेश देत पुढे जात होती. मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.

बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला मालार्पण करून जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचली. मिरवणुकीत समता सैनिक दलाचे २०० सैनिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.