चंद्रपुर

ताडोबा प्रकल्प सुरू करा:- होम स्टे असो.चे मुख्यमंत्र्यांना साकडे

मोहर्ली (ता.प्र): जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ऐन हंगामात तीन महिन्यांपासून बंदअसल्यानं इथल्या पर्यटनावर आधारित हजारो लोकांचा रोजगार बुडाला. परिणामी या लोकांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. या लोकांना वाचवण्यासाठी शासनाने ताडोबा प्रकल्प तातडीने सुरू करावा, अशी मागणी येथील होम स्टे असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी ताडोबा पर्यटनावर आधारित लोकांची व्यथा व्यक्त केली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा सुगीचा हंगाम म्हणजे उन्हाळा. देश-विदेशातून लाखो पर्यटक इथे पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळं इथला छोटा-मोठा व्यवसाय बहरतो. हजारो हातांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. वर्षातील चार महिन्यांचा हा हंगाम येथील लोकांना वर्षभर जगण्याची कशीबशी सोय करतो. मात्र  यावेळी आलेल्या कोरोना संकटाने या लोकांच्या जगण्यावरच आघात केलाय. आधीच कोरोनाचे भयाण संकट आणि त्यात रोजगाराचा अभाव, यामुळं ताडोबावर आधारित लोक उघड्यावर आले.राज्यात आता टाळेबंदी उठवण्यात आली. त्यामुळं ताडोबाचे पर्यटनही सुरू केल्यास मोठी मदत या लोकांना होऊ शकते. येथे अनेक छोटे होम स्टे आहेत. एका होम स्टेवर किमान चार स्थानिकांचे कुटुंब जगते. छोटे व्यवयायी, चहाटपरी, किराणा व्यवसायी, भाजीपाला विक्रेते, टुरिस्ट गाईड हे सारेच घटक केवळ पर्यटनावर आपली उपजीविका करतात. पण मागील तीन महिन्यांपासून त्यांच्या हातात एक पैसासुद्धा येऊ शकलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *