चंद्रपुर,दि.13 जून: सद्यस्थितीत राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. यातच नागरिकांना महत्त्वाचे व्यवहार करण्याकरीता आधार कार्डची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आधार केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.सर्व आधार नोंदणी केंद्र चालकांनी आपल्या केंद्राचा परिसर दररोज स्वच्छ करुन केंद्रातील सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करावे. आधार नोंदणी केंद्रावरील व्यवस्थापक व कर्मचारी यांनी कोरोनाच्या स्वच्छता पध्दतीचे पालन करावे. कार्यरत कर्मचारी,येणाऱ्या नागरीकांकरीता साबणाने किंवा हॅण्ड सॅनिटायजरने हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.
सर्व कर्मचाऱ्यांनी काम करतेवेळी नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे व वैयक्तिक स्वच्छता पाळावी. कर्मचारी, नागरीकांनी काम करतांना नेहमी मास्क लावावे. आधार नोंदणी करतांना नागरीकांनी मास्क काढून फोटो काढावे.आधार नोंदणी केंद्राना भेट देणाऱ्या नागरीकांनी बायोमॅट्रीक उपकरणांना व इतर साधानांना स्पर्श करण्यापूर्वी हात साबणांनी धुवावे व तशी व्यवस्था केंद्र चालकांनी त्याठिकाणी उपलब्ध करावी . प्रत्येक नोंदणी झाल्यानंतर आधार नोंदणी चालकांनी बायोमॅट्रीक उपकरणे सॅनेटराईज करणे आवश्यक राहील. आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांपैकी जर कुणी सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनाच्या त्रासाने त्रस्त असेल तर त्यांना बरे होईपर्यंत केंद्रात काम करु देवु नये.
जर एखादा नागरीक सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनाच्या त्रासाने ग्रस्त असेल व आधार नोंदणी करीता किंवा इतर कामाकरीता आला असेल तर त्यांना पुर्णपणे बरे झाल्यानंतर येण्यास विनंती करावी. आधार नोंदणी चालकांनी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक नागरीकांची नोंद (संपुर्ण नाव, संपूर्ण पत्ता व मो.क्र) नोंदवहीत घेण्यात यावी.



