चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी आरक्षणाचे बनावट संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची लुट

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी आरक्षणाचे बनावट संकेतस्थळ तयार करून एका पर्यटकाला लुटल्या गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ताडोबा प्रशासनाने सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार नोंदविली असल्याचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी आरक्षित करण्यासाठी एका पर्यटकाने ‘ताडोबा सफारी बुकींग डॉट इन’ या संकेतस्थळावर जावून आरक्षण केले. जुनोना प्रवेशव्दाराचे आरक्षण करीत ऑनलाईन पैसे भरले. पर्यटकाला ऑनलाईन संकेतस्थळावरून आरक्षणाचा संदेश जाणे गरजेचे असताना एका त्रयस्त व्यक्तींने त्यांना फोन करून जुनोना प्रवेशव्दारावरील आरक्षण पूर्ण संपल्याचे झाल्याचे सांगितले. तुम्हाला तुमचे पैसे परत ऑनलाईन मिळतील असेही सांगितले. परत पुन्हा फोन करून मामला प्रवेशव्दारावर आरक्षण आहे. तेथे आरक्षण करा, असा सल्लाही दिला. परंतु, पर्यटकाने आरक्षण रद्द केले. मात्र, त्याला पैसे परत मिळाले नाही. वारंवार संपर्क करूनही थोडा धीर धरा पैसे जमा होतील, अशीच माहिती तो त्रयस्त व्यक्ती देत होता.  ऑनलाईन बुकींग असताना त्रयस्त व्यक्ती फोन करून आरक्षणाची पुष्टी कशी देतो, असा प्रश्न या निमत्ताने उभा ठाकल्याने आणि पैसे खात्यात जमा न झाल्याने त्या पर्यटकाने समाजमाध्यमावर ही माहिती जाहीर केली. दरम्यान घटनेची माहिती ताडोबाच्या क्षेत्रसंचालक कार्यालयाला होताच क्षेत्रसंचालकांनी सायबर पोलिसांना बनावट संकेतस्थळाव्दारे पर्यटकांची फसवणूक होत असल्याची तक्रार दिली. ;‘माय ताडोबा डॉट ओआरजी’ हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ आहे. मध्यस्त तसेच पूर्ण सफारी आरक्षित करून देण्याचा दावा करणारे किंवा बनावट संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची फसवणूक करणार्‍यांपासून सावधान रहावे, असे आवाहन रामगावकर यांनी केले आहे. तसेच फसवणूक करणार्‍या संबंधित आठ आरक्षण संकेतस्थळावर कारवाई करावी यासाठी पोलिसात तक्रारीत मागणी केले असल्याची माहिती रामगावकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.