चंद्रपूर, दि. 12 मे : जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या 52 दिवसात आतापर्यंत एकूण 55 हजार 736 नागरिकांना होम कॉरेन्टाइन अर्थात गृह अलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आत्तापर्यंत 62 नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून 60 नमुने निगेटिव्ह आहे. दोन नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात कृष्ण नगर परिसरातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कातील 95 लोकांची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत त्याच्या संपर्कातील 62 लोकांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 60 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह निघाले आहे. दोन नागरिकांचे नमुने प्रतीक्षेत आहे. संपर्कातील 95 नागरिकांपैकी 66 नागरिकांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. तर 29 नागरिकांना संस्थात्मक कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. कृष्ण नगर परिसरात आज सलग दहाव्या दिवशी 47 आरोग्य पथकाने या परिसरातील 2 हजार 152 घरांची आरोग्य पाहणी केली. श्वसनाचा आजार किंवा ताप असणाऱ्या रुग्णांची देखील विशेष दखल घेतली जात आहे.या परिसरात 12 मे रोजी पर्यत कोणत्याही संशयित रुग्णांची नोंद नाही.



