चंद्रपूर २३ मे – वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषतः चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची संभावना आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू टाळण्यासाठी नागरीकांनी उपाययोजना राबवाव्यात. कारण अगोदरच आरोग्य यंत्रणेचा कोरोनाबाबत लढा सुरू असल्याने तसेच आता येणा-या उष्णतेमुळे लोकांची प्रतिकारक शक्ती कमी होवून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी उष्णतेची लाट तीव्र स्वरूपात असल्याने आवश्यक काळजी घेणे गरजेची आहे अशा सूचना भारतीय हवामान खात्याने दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने या उष्णतेच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे पालन प्रत्येक नागरीकांनी करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे .



