गडचिरोली

गोरखनाथ समाजाच्या लोकांची आरोग्य तपासणी

 चामोर्शी (मवृसे)कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. अशा स्थितीत चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे विश्वशांती विद्यालयालगतच्या मोकळ्या जागेत तात्पूरत्या झोपड्या बांधून गेल्या १५ ते २० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील गोरखनाथ समाजाचे ४० ते ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. या झोपड्यांमधील सर्व नागरिकांची भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या लोकांचा व्यवसाय मंदावला असला तरी त्यांना स्वत:च्या जिल्ह्यातही जाणे शक्य झाले नाही.

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. अनुपकुमार कमल यांनी आपल्या चमुला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाला जाऊ शकता, अशा सुचना डॉ.कमल यांनी सर्व कुटुंबांना दिल्या आहेत. गोरखनाथ समाजातील ४० ते ५० कुटुंब झोपड्या बांधून आहेत.

या झोपड्यांवर ताडपत्रींचे छत आहे. सदर जमात भटकंती असल्याचे सर्वत्र ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले गोरखनाथ समाजाचे लोक वर्षातून चार महिने आपले नेहमीचे घर सोडून जिल्हाबाहेर जाऊन पारंपारिक व्यवसाय करतात. बेन्टेक्सच्या वस्तू विकणे, कुकर दुरूस्त करणे, झाडू विकणे आदी कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षापासून या समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी येत आहेत.

यंदा चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे झोपड्या बांधून अल्पावधीच्या व्यवसायासाठी गोरखनाथ समाजाचे कुटूंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत दारिद्र्याची आहे. विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गात हा समाज मोडतो. दिवाळी नंतर सदर कुटुंबाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने दुसèया जिल्ह्यात स्थलांतर करतात. एप्रिल महिन्यात पुन्हा स्वत:च्या जिल्ह्यात परत जातात. कोरोनामुळे या कुटुंबाचा व्यवसाय थंडबस्त्यात आहे. गोरखनाथ समाजाच्या या ५० कुटुंबामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेले १० ते १५ मुले, मुली भेंडाळा येथे झोपड्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.