
एकोणा खाणीतील कोळशाच्या जड वाहतुकीने नागरिक होते त्रस्त
वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी घेतला जड वाहतूक बंदीचा निर्णय
चंद्रपूर : वेकोलिच्या एकोणा येथील खाणीतून कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणास सुरू होती. दिवस-रात्र धावणाऱ्या वाहनांचा आवाज आणि धुळीच्या प्रदूषणामुळे वरोरा, माढेळी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार धानोरकरांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, कारवाई झाली नाही. अखेर, शनिवारी २५ जूनला खासदार धानोरकर यांनी स्वता जड वाहतूक रोखून धरली. ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी कोळशाची जड वाहतूक बंद करण्याचे आदेश काढले आहेत.
वरोरा ते माढेळी मार्गाने एकोणा खाणीतील कोळशाची जड वाहतूक होत होती. ४० टनाची वाहने धावण्याची क्षमता नसलेल्या मार्गाने जड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. तसेच सतत धावणाऱ्या जड वाहनांमुळे दळणवळणास अडथळा निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक जिव मुठीत घेऊन ये-जा करीत होते. या मार्गाने होणारी जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले. वरोरा या तालुक्याच्या मुख्यालयी येण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना वेकोलिला देण्यात आल्या. परंतु, दोन वर्षांचा काळ लोटूनही वेकोलि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वरोराचे सहायक अभियंता यांनी वरोरा-माढेळी मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता.



