
विजय मिळाल्यास पहिल्या आदिवासी राष्ट्रपती
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. द्रौपदी मुर्मू यांचे नाव एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नड्डा यांनी दिली. द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या तर देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरणार आहे.
मंगळवारी संध्याकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर मुर्मू यांच्या नावावर एकमत झाले. संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाली आणि आदिवासी महिला नेत्या मुर्मू यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू
झारखंडच्या नवव्या राज्यपाल असलेल्या ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशातील मयूरभंजच्या आहेत. ओडिशातील रायरंगपूरमधून त्या आमदार झाल्या आहेत. राज्यपाल बनलेले ते पहिले ओडिया नेते आहेत. याआधी २००२ ते २००४ या काळात त्या भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपालही आहेत.




