दोन दिवसांपासून होताहेत समाज माध्यमांवर ट्रोल
महाविकास आघाडीची साथ सोडून थेट गुवाहाटी गाठून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ह्यांना साथ देणारे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार ह्यांना चंद्रपूर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरविली असल्याचे कळले आहे.
मागील अडीच वर्षांपासून ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या किशोर जोरगेवार ह्यांनी अचानक एकनाथ शिंदे गटाला समर्थन जाहीर करून थेट गुवाहाटी गाठले. त्यानंतर समाजमाध्यमांवर आ. किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात अनेक संदेश फिरत असुन वीज निर्मिती करणाऱ्या जिल्ह्यात 200 युनिट वीज माफ करण्याची घोषणा देऊन ते निवडून आले होते मात्र अजूनही त्यांचे आश्वासन पुर्ण झाले नसून त्या आश्वासनांचे काय झाले असा खोचक प्रश्न समाज माध्यमांवर फिरत आहे.
त्याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी देखील आ. किशोर जोरगेवार ह्यांना लक्ष करत मागील अडीच वर्षांचा हिशेब मागितला असुन महविकस आघाडीशी काडीमोड घेतल्याप्रकरणी टीकेची झोड उठवली आहे.
किशोर जोरगेवार हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते होते त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यालयाला धोका असुन शिवसैनिक कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करू शकतात ह्या भीतीने पोलिसांनी आमदार कार्यालयास अतिरिक्त सुरक्षा पुरविली असल्याचे कळले आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकारने आमदारांना पुरविली सुरक्षा काढली असल्याचे बंडखोर गटाचे म्हणणे असुन केंद्र सरकारने मुंबईतील बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे त्याच धर्तीवर आ. किशोर जोरगेवार ह्यांनाही वाय दर्जाची सुरक्षा मिळणार का हे लवकरच कळेल.



