चंद्रपूर जिल्ह्यातील ५१ बाधित कोरोना मुक्त चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शनिवार २७ जूनपर्यंतची बाधितांची संख्या ८० झाली आहे. तर समाधानाची बाब म्हणजे या बाधितांपैकी ५१ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या चार नागरिकांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहे.
यामध्ये टिळकनगर ब्रह्मपुरी येथील 24 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नागपूर शहरातून 25 जून रोजी परतलेल्या या युवकाला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 26 तारखेला विलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील अन्य 22 वर्षीय महिलेला नागपूर येथून 25 तारखेला परतल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 26 ला घेतलेला त्यांचा स्वॅब 27 ला पॉझिटिव्ह आला आहे.
तर पटेल नगर ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय आई व तिचा 34 वर्षीय मुलगा यांना अकोला येथून परत आल्यानंतर 26 तारखेला विलगीकरणात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वब घेण्यात आला होता. आज २७ ला तो पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना आता चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
तर अन्य दोन बाधित हे आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीतून पुढे आले आहेत.यामध्ये गांगलवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय महिला असे हे दोन बाधित आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.




