आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ९ दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्यीय वाहनचोर टोळीतील दोन कुख्यात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांतील अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात ४ जुलै २०२६ रोजी सरकारी रुग्णालयासमोरील पार्किंगमधून हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. MH 34 BT 1880) ही मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रदीप संजय शेरकुरे (वय २९, रा. पारधीगुडा, भोपटाळा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर) आणि आशिक इब्राहिम शेख (वय ३४, रा. कुरई, ता. वणी, जि. यवतमाळ) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वाहनचोरीची कबुली दिली.
आरोपींकडून हिरो स्प्लेंडर, हिरो पॅशन, होंडा सीबी शाईन, होंडा एसपी-१२५, बजाज सीटी-१०० आदी विविध कंपनींच्या ९ चोरीच्या मोटारसायकली, एकूण अंदाजे ४.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस चौकशीत आरोपींनी एकूण ११ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी एक मोटारसायकल २०२५ मध्ये चोरीला गेल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याने जप्त केल्याचे, तर दोन महिन्यांपूर्वी महाकाली मंदिर परिसरातून चोरीस गेलेली आणखी एक मोटारसायकल कोरपणा येथील उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.
या कारवाईमुळे वाहनचोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून, आरोपींकडून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.




