चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

➤ चंद्रपुरात दिव्यांगांच्या ५ टक्के निधीसाठी ‘प्रहार’चा मनपावर धडक मुक्काम मोर्चा!

​चंद्रपूर- महानगरपालिकेकडून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला ५ टक्के वार्षिक निधी नियमित वितरित करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज चंद्रपूर मनपा कार्यालयासमोर तीव्र ‘मुक्काम मोर्चा’ आंदोलन छेडले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. मागील काही वर्षांपासून हक्काचा निधी मिळत नसल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र असंतोष आहे. या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा दिला. मनपा आयुक्तांची हिटलरशाही सुरू असून, दिव्यांगांचा हक्क मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही; हा मुद्दा आमदार बच्चू कडू आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून थेट सरकार दरबारी मांडू, असा इशारा प्रतिमा ठाकूर यांनी दिला. तर मागील तीन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही मनपाने आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा संतप्त पवित्रा दिव्यांग महिला प्रतिनिधी कल्पना शिंदे यांनी घेतला. दरम्यान, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा ‘प्रहार’ने प्रशासनाला दिला असून, या आंदोलनामुळे मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.