
चंद्रपूर : शेतात काम करीत असताना वादळी वा-यासह झालेल्या पावसादरम्यान विज पडून एका 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असून 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी (11जून) दुपारच्या सुमारास वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेतशिवारात घडली. सोहम हरिदास काळे (वय 20) असे मृताचे नाव आहे. वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेतशिवारात हरिदास काळे यांचे शेतात आज शनिवारी काही मजूर काम करीत होते. दूपारच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व मजूर शेतात असलेल्या एका झाडाखाली आश्रयास थांबले होते. दरम्यान विज पडून सोहम हरिदास काळे या तरूणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले इतर चार जण गंभीर जखमी झाले. त्यामध्ये शिवम देविदास काळे (वय 12), नितीन बाबाराव काळे (वय 22), ललित बाबाराव काळे (वय 28), कार्तिक हरिदास काळे (वय 17), उज्वला हरिदास काळे (वय 45), यांचा समावेश आहे. जखमी व मृतक हे दिंदोडा येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.




