
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. 287 आमदारांपैकी 164 मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात 99 जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज 20 आमदार गैरहजर होते. दरम्यान बहुमत चाचणीनंतर सभागृहातील नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाषण करताना अनेकांनी टोलेबाजी केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी निर्णय घेणार आहे. तसेच ज्या हिरकणीने इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.




