चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आवळगाव येथील युवकाचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू

ब्रम्हपुरी – मित्रासोबत सहभोजन करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील आवळगाव येथील युवकाचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी दूपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. देवानंद वामन कोटनाक (22) असे मृतकाचे नाव आहे. देवानंद कोटनाके हा 16 नोव्हेंबरला वैनगंगा नदी तीरावर असलेल्या चीचगाव (डोर्ली) व आवळगाव त्रिवेनी संगम नदी तिराच्या मध्यभागी असलेल्या शेतामध्ये सहभोजन करण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. देवानंद हा घट बांधकामाचे काम करण्यासाठी जात होता. घर बांधकामाला जात असलेल्या गावातील मित्रांनी मिळून सहभोजन करण्याचा निर्णय घेतला. सहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर देवानंद हात धुवायला वैनगंगा नदी तीरावर गेला. यावेळी तोल गेल्याने तो नदीपात्रात पडला. मित्राने त्याचा शोध घेतला. परंतु, तो गवसला नाही या बाबतची माहिती मेंडकी पोलिस चौकीला देण्यात आली. पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणबुड्याच्या साह्याने नदीपात्रात देवानंदचा शोध घेतला. सलग दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 18 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास हळदा येथे देवानंदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मृतक देवानंदच्या कुटुंबात तिन सदस्य असून घरचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास संबधित विभागाचे पोलिस करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *