
देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
देशभरात लॉक डाऊन सुरु असून आणखी २० दिवस अशीच स्थिती राहणार आहे. या कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान योजनेत सरकारने १५००० कोटी मंजूर केले आहेत.लवकरच टप्याटप्याने ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
जवळपास साडेसात कोटी शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभर २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषीत केला आहे.अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शेतकरी बांधवांना शेतमाल नेण्यासाठी अनके अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत दोन हजारांची मदत शेतकऱ्यांना थोडीफार दिलासा देणारी ठरणार आहे. येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जाणार आहे. पीएम किसान योजनेत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत केली जाणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती संबंधित राज्य सरकारांना पाठवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.



