चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आरे समुदायाला केंद्राच्या ओबीसी अनुसूचीत समाविष्ट करून घ्या – हंसराज अहीर

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना तेलंगनातील शिष्टमंडळ भेटले

चंद्रपूर:- आरे, आरेवलु व आरोलु या जातींचा तेलंगणा सरकारच्या यादीमध्ये बी.सी-डी सिरियल नं. 34 मध्ये अंतर्भाव असून आरे समुदायाच्या या जातींचा केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीय यादीमध्ये समावेश करण्यात यावा. या प्रमुख मागणीचे निवेदन शिष्टमंडळाव्दारे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना सोपविण्यात आले.

दि. 16 एप्रिल, 2023 रोजी हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी भेटलेल्या या शिष्टमंडळात तेलंगणातील आदिलाबाद, कागजनगर, मंचेरियल व अन्य जिल्ह्यातील आरे समुदायातील बांधव उपस्थित होते. यात प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारी समिती सदस्य तेलंगणाचे डॉ. हरिश बाबु, जिल्हाध्यक्ष आरे समाज मंचेरियल रावजी चाफले, आरे एम्प्लॉय्ज वेल्फेयर असोसिएशन महासचिव दामोदर डोके, बीजेपी मंडळ अध्यक्ष शिरपूर (टाऊन) शंकर येलमुले, शंकर चनकापुरे, निलेश कोलगमकर, दशरथ येलमुले, चंद्रशेखर जलकटी, रविंद्र लोणारे, सुभाष चौधरी, भगवान चौधरी, लचन्ना भुजाडे आदींची यावेळी उपस्थिती होती..

शिष्टमंडळाने याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना सांगितले की, आयोगाव्दारे दि. 22 डिसेंबर, 2021 रोजी चौकशी करुन केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात 32 जातींचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून सदर प्रस्ताव प्रलंबित असल्याने याबाबत आयोगाव्दारे निर्णय घेण्याची कार्यवाही करावी अशी विनंती केली. यासंदर्भात तेलंगणा सरकारने शिफारस केली असल्याने न्यायोचित निर्णय घेवून आरे समुदायास केंद्र सरकारच्या ओबीसी अनुसूची यादीत समावेश करुन या समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सदर प्रकरण तपासून व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन या मागणीबाबत आयोगाव्दारे उचित निर्णय घेण्यात येईल असे ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी शिष्टमंडळास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.