राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज आणखी ४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५३७ वर पोहोचला आहे. नव्यानं आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे. मुंबईत कालपर्यंत २७८ रुग्ण होते. आज त्यात आणखी २८ जणांची भर पडली आहे. त्यामुळे हा आकडा आता ३०६ झाला आहे. राज्यात आतापर्यंत २७ जणांचा करोनामुळेमृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने आजपासून आणखी १० ठिकाणी करोना संशयितांची तपासणी करण्यासाठी दवाखाने सुरू केले आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या व कंटेनमेंट झोन लगतच्या परिसरात हे दवाखाने आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांच्या कालावधीत हे दवाखाने सुरू राहणार आहेत. इथे एक डॉक्टर आणि एक परिचारिका असा स्टाफ असेल.



