चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अखेर त्या 13 विद्यार्थ्यांना शाळेने परत घेतले – नारायणा विद्यालयम् प्रशासन नरमले त्या विद्यार्थ्यांना चालु सत्रात मिळणार मोफत शिक्षण – पालकांनी शाळेत जाण्यास मज्जाव

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी 

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही ह्या कारणास्तव चंद्रपूर येथिल नामांकित नारायणा विद्यालयम् ने तेरा (१३) विद्यार्थ्यांना पालकांशी कुठलीही चर्चा न करता त्याचप्रमाणे शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याचे उल्लंघन करून शाळेतून काढुन टाकले व त्यांच्या टी सी थेट रजिस्टर्ड पोस्टाने घरी पाठविण्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. चांदा ब्लास्ट ने त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला शाळा प्रशासन दोषी असल्याचे म्हंटले होते.

शाळा व्यवस्थापन, जिल्हा परिषद व्यवस्थापन, जिल्हा परिषद अध्यक्षा व शिक्षणाधिकारी ह्यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत चांदा ब्लास्ट च्या आक्षेपावर शिक्कामोर्तब झाले असुन शाळा व्यवस्थापन प्रशासन व पालकांच्या ठाम भूमिकेमुळे नरमले असुन त्या 13 विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा प्रवेश देण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले असुन त्या विद्यार्थ्यांचे सन 2021-22 चे  शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आल्याचे ठरविण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे..जिल्ह्यात घडलेल्या शाळेच्या ह्या बेबंदशाही वागणुकीमुळे संपुर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली होती. अखेर काल झालेल्या बैठकीत विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र परत घेऊन नियमित शिक्षण द्यावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी नारायणा विद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिले. शाळा व्यवस्थापनाच्या या निर्णयाने मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते व त्यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी ह्यांनी पुढाकार घेऊन शाळा व्यवस्थापनासोबत बैठक आयोजित केली होती. ह्या बैठकीला अध्यक्षा संध्या गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, शिक्षण अधिकारी उल्हास नरड, नारायणा विद्यालयाचे अध्यक्ष सचिन अग्निहोत्री, मुख्याध्यापिका तथा व्यवस्थापक यांची आज जिल्हा परिषदेत कार्यालयात संयुक्त बैठक झाली .या बैठकीत विद्यालयाने विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र परत घेऊन त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत सुरू करण्यात यावे असे निर्देश सीईओ मिताली सेठी यांनी नारायण विद्यालयाला दिल्याची माहिती शिक्षण अधिकारी उल्हास नरड यांनी चांदा ब्लास्ट ला दिली.

विशेष म्हणजे या 13 विद्यार्थीना मोफत शिक्षण द्यावे. असे निर्देश दिल्याचे नरड यांनी सांगितले . या संदर्भात नारायणा विद्यालयाचे सचिन अग्निहोत्री यांच्याशी संपर्क साधता आला असता, बैठक झाली परंतु मोफत शिक्षणाच्या निर्णय झाला नाही मात्र त्याविषयी सकारात्मक निर्णय येत्या एक-दोन दिवसात घेण्यात येईल असे सांगितले आहे.

चांदा ब्लास्ट ने ह्या पूर्वीही नारायणा विद्यालयाच्या कारभारावर बातम्या प्रकाशित करून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या उघड केल्या होत्या त्याचप्रमाणे शाळेने 13 विद्यार्थ्यांना काढुन टाकण्याच्या तुघलकी निर्णयाविरुद्ध सर्वप्रथम बातमी प्रकाशित करून आसूड ओढले होते. चांदा ब्लास्टच्या कणखर भूमिकेमुळे आमच्या लढ्याला यश आले असुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य सावरण्यासाठी चांदा ब्लास्टचे मोठे योगदान असल्याचे पालकांनी म्हंटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.