
चंद्रपूर : कोविडसारख्या संकट काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला जबाबदारीने सांभाळले. राज्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागील अडीच महिन्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला भेट देत राज्यात बेरोजगारी वाढवित असल्याचा आरोप करीत शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने स्थानिक गांधी चौकात सोमवारी आंदोलन करण्यात आले. लाखो लोकांसाठी रोजगार उपलब्ध करू शकणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प विद्यमान सरकारच्या चुकीमुळे गुजरातमध्ये गेला. हे भाजपाचे षडयंत्र असून, शिंदे सरकार या षडयंत्राला बळी पडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, शहरप्रमुख सुरेश पचारे, तालुकाप्रमुख संतोष जरुले, स्वप्नील काशिकर, युवासेनेचे विक्रांत सहारे, विजय धोबे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, राज्य उपाध्यक्ष दिलीप चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे, मोरेश्वर चटप आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.



