
चंद्रपूर : गावापासून 1 किमी अंतरावरील शेतात धान कापणी करीत असताना एका 45 वर्षीय महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून बळी घेतल्याची खळबळजणक घटना आज सोमवारी (28 नोव्हेंबर) ला सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. चक्क शेतात येऊन महिलेवर हल्ला केला आणि घटना स्थळापासून 50 फुट अंतरावर तिला फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने सावरगाव शेतशिवारात दहशत पसरली आहे. संगिता संजय खंडरे असे मृत महिलेचे नाव असून ती सावरगाव शिवनगर येथील रहिवासी होती. या घटनेने धान कापणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेचे वृत्त असे की, नागभिड तालुक्यातील तळोधी (बाळापूर) शहरापासून हाकेच्या अंतरावर सावरगाव चंद्रपूर मार्गावर आहे. या परिसरात धान कापणीला वेग आला आहे. आज सोमवारी सावरगाव पासून 1 किमी अंतरावरील मामा तलावाजवळ बाजीराव कोहरे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात काही महिला मजूरीने सकाळी धान कापणीला गेल्या होत्या. दिवसभर धान कापणी केल्या नंतर सायंकाळी पाच वाजताचे सुमारास ही महिला खाली मान करून धान कापत होती. दरम्यान शेताला लागून असलेल्या एका नाल्यात दबा धरून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने तिच्यावर अचानक हल्ला चढविला. तिच्या मानेला जबड्यात पकडून नेऊ लागला. अचानक घडलेल्या या घटनेने अन्य धान कापत असलेल्या महिलांची चांगलीच तारांबळ उडाली. काय करावे ? काय नाही ? सुचेनासे झाले. यावेळी शेतात शेतमालकाचा मुलगा प्रभाकर कोहरे व त्याची पत्नीही शेतात होते. वाघाने हल्ला करून तिचा जबड्यात घेऊन फरफरट नेऊ लागल्याने प्रभाकरने काठीने त्याला पिठाळून लावले.याकामी त्याच्या पत्नीनेही त्याला पिळाण्यास मदत केली. बराचवेळ त्याला पिठाल्यानंतर त्याने 50 फुटानंतर त्या महिलेला सोडून पळ काढला. या घटनेची आरडाओरड झाल्याने माहिती लगतच्या शेतपरिसरात पसरली. काही शेतकरी धावून आले. तो पर्यंत पट्टेदार वाघ पळून गेला होता. लगेच नागरिकांनी घटनेची माहिती गावात कुटूंबियांना व तळोधी वनविभागाला दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गंभीर जखमी संगिता खंडरे हिला तळोधी येथील सरकारी रूग्णालयात प्राथमिक औषधोपचार करीता दाखल केले. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे हलविले. मात्र सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान तिला मृत घोषीत केले. मृतक संगिता खंडरे, एक मुलगा व एक मुलगी असा तिघांचा परिवार होता. पतीचे पूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे मुलगा व मुलीची सर्व जबाबदारी ही मृतक महिलेवर होती. मात्र आईच्या मृत्यूने दोघेही अनाथ झाले आहेत. दोघांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. 48 तासापूर्वी नागभिड तालुक्यातील पहार्णी येथील एका 57 वर्षीय महिला शेतात गवत घेण्याकरीता गेली असता दोन वाघांनी तिच्या हल्ला करून धड व मुंडके वेगळे रून बळी घेतल्याची घटना अगदी ताजी असतानाच सावरगाव शेतशिवारात आज सोमवारी घटना घडल्याने धान कापणी करीता जाणाऱ्या महिला मध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने धान कापणीकरीता शेतशिवारात बंदोबस्त लावावा अशी मागणी महिलां करू लागल्या आहेत. नागभिड तालुक्यात सध्या धान कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत महिला दिवसभर कापणी करतात. सायंकाळी परत घरी येतात. जंगलात होणारे वाघांचे हल्ले आता शेतात होवू लागल्याने महिलांना धान कापणी कशी करायची ? असा प्रश्न पडला आहे. मानव व वन्यप्राणी यांच्यात होणारा संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. हा संघर्ष कमी करण्यास वनविभाग अपयशी ठरला आहे. दरदिवशी वाघांच्या हल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे. मात्र वनविभाग हातावर हात धरून पहात असल्याचा आरोपी शेतकरीत करीत आहेत. जंगलात होणारे हल्ले आता शेतात होऊ लागल्याने वाघांचे अतिक्रमण मानवाच्या निवासात होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. नेहमी वन्यप्राण्यांच्या निवासस्थानात मानवाचा शिरकाव होऊ लागल्याने वाघांच्या घटना असल्याचा निष्कर्ष ऐरवी काढल्या जात होता. परंतु मानवाच्या निवासस्थानात वाघांचे अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचा बळी आज असल्याचा प्रतिक्रीया शेतकरी शेतमजुरांमध्ये दिसून येत आहेत.




