![]()
* शुक्रवारी मशाल, तर शनिवारी वाहन रॅली
* चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन
चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या पुढाकारातून देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. सध्या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू आहे. या यात्रेच्या जनजागृतीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्त्वात विविध उपक्रम राबविले जात आहे. याच उपक्रमांतर्गत प्रचार वाहनाच्या माध्यमातून शहरात जनजागृती केली जात आहे. या वाहनाला खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. त्यासोबतच शहरात शुक्रवारी मशाल, तर शनिवारी वाहन रॅली काढण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. देशाच्या इतिहासात ही पहिलीच यात्रा आहे. या यात्रेत चंद्रपूर महानगरातून सर्वाधिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यासोबतच सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग वाढावा या उद्देशातून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहरात प्रचार वाहन फिरविण्यात येत आहे. या वाहनाला खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत वाशिम येथून सहभागी होण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते १४ नोव्हेंबरला दुपारी रवाना होणार आहेत. या यात्रेत काँग्रेस सोबतच समाजातील सर्व घटक सहभागी व्हावे यासाठी शहरातून शुक्रवारी ११ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत जटपुरा गेट परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. त्यासोबतच शनिवारी १२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता कस्तुरबा चौकातून वाहन रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गाने रॅली मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.


