
मुंबई (मवृसे)कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असून, १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या पट्ट्यात येतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडिओ संवाद साधला. याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले.
येत्या एक दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगून टोपे म्हणाले, केंद्र सरकारने १५ आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, १५ पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. म्हणजे या दोन झोनमध्ये येणाèयाजिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली.



