जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात जन विकास सेनेचे आंदोलन
उद्यापासून सर्वपक्षीय आंदोलन करणार
चंद्रपूर (का.प्र ):काल अचानक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली.शासनाने केलेल्या या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी हे पेशाने डॉक्टर आहेत.मागील चार महिन्यापासून covid-19 आपत्तीचे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करीत आहेत.कोविडची आपत्ती आल्यानंतर तीन महिन्यापर्यंत चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नियोजनाचं व त्यांच्या नेतृत्वात चतुर्थश्रेणी कर्मचारी ते अधिकारी व कंत्राटी कामगार या सर्वांच्या टीमने अतिशय चांगले काम केलेले आहे. जिल्हाधिकारी यांना चंद्रपुरात केवळ दोन वर्ष झाले. प्रामाणिक व होतकरू अधिकारी असलेले डाॅ.खेमनार यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक सामान्य माणसाची कैफियत ऐकून घेणे, नियमात बसत असेल तर तातडीने न्याय देणे ही त्यांची पद्धत अनेकांना भावलेली आहे. आजपावेतो जिल्हाधिकारी यांच्याविरोधात सामान्य जनता किंवा राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटना कोणीही त्यांच्याविरोधात तक्रार केली नाही.सर्व स्तरातून त्यांना सहकार्य करण्यात आलेले आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये covid-19 च्या व्यवस्थापनाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून याचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ होत आहे. मात्र त्यांची अचानक बदली केल्यामुळे covid-19 आपत्तीचे व्यवस्थापन कोसळण्याची शक्यता असून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा हा प्रकार असल्याचे पप्पू देशमुख यांनी म्हटलेले आहे.यापूर्वी आपत्तीच्या काळात प्रशासनावर उत्तम पकड असलेले महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांची बदली केल्याने शहरातील नागरिकांमध्ये आधीच असंतोष आहे. चांगलं काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना केवळ दोन वर्षे झालेले असताना व आपत्तीची कठीण परिस्थिती असताना त्यांची बदली करण्याचा प्रकार म्हणजे ‘अंधा कानून’ असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.या बदली विरोधात आज जन विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर काळी पट्टी बांधून निदर्शने केली.तसेच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी जन विकास सेनेने केलेली आहे.या आंदोलनात ‘जन विकास’ चे घनश्याम येरगुडे,निलेश पाझारे,किशोर महाजन, इमदाद शेख,मनीषा बोबडे,राहुल दडमल, दिनेश कंपू, प्रफुल बैरम, नामदेव पिपरे, अक्षय येरगुडे,आकाश लोडे, तुषार निखाडे,संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे,निखिल भोजेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.




