सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या; ६ घरफोडी व ३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आंध्र प्रदेशातील सराईत आंतरराज्यीय घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ६ घरफोडी व ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्यात १९ मे २०२६ रोजी एका महिलेच्या घरफोडीची तक्रार दाखल झाली होती. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून सुमारे २ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व ५ हजार रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार व पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंद्री) येथून चिन्नाबाबू गोरेला याला ताब्यात घेतले.
आरोपीची ओळख पटविण्यास तेलंगणा पोलिसांचे अंमलदार नरेश दत्त यांनी मोलाची मदत केली. तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल ४७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ६ घरफोडी व ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.




