Uncategorized

चुलत भावाने केली भावाची हत्या विहीरगाव येथिल घटना : आरोपीला अटक

चुलत भावाने केली भावाची हत्या

विहीरगाव येथिल घटना : आरोपीला अटक

राजुरा : तालुक्यातील विहीरगाव येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २ जुलै रोजी रात्री घडली. दारूच्या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या चुलत भावाचा संतापाच्या भरात बांबूच्या उभारीने डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याने संपूर्ण गावात भीती व खळबळ पसरली आहे. रविंद्र शंकर गुरमेट्टीवार ३८ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक रविंद्र शंकर गुरमेट्टीवार ३८ वर्ष हा गुरुवारी रात्री दारूच्या नशेत घरी आला होता. त्यानंतर त्याने आई अनिता गुरमेट्टीवार व वडिलांशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर हाताबुक्क्यांनी मारहाण केले. एवढ्यावरच न थांबता त्याने हातात कुऱ्हाड घेऊन कुटुंबीयांच्या अंगावर धाव घेतल्याने घाबरलेल्या आई-वडिलांनी घरातून पळ काढला. यानंतर मृतकाची आई अनिता गुरमेट्टीवार यांनी गावचे पोलीस पाटील सचिन राजेश्वर बोढे यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी नितीन गुरमेट्टीवार याला फोन लावून परिस्थितीची माहिती दिली. काही वेळानंतर रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास नितीन गुरमेट्टीवार याने स्वतः पोलीस पाटील बोढे यांना फोन करून, मी रविंद्रला संपवले आहे. त्याचा मला व माझ्या काका-काकूंना खूप त्रास होता. असे सांगितले.

ही माहिती मिळताच पोलीस पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपी नितीन गजानन गुरमेट्टीवार ३४ वर्ष हा हातात बांबूची उभारी घेऊन उभा होता. त्याने त्याच उभारीने रविंद्रच्या डोक्यावर तीन ते चार जोरदार प्रहार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. घरासमोरील अंगणात आंब्याच्या झाडाखाली रविंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. उजव्या कानाला खोल जखम झाली होती, कानातून रक्तस्त्राव सुरू होता, तर डोक्याच्या मागील भागालाही गंभीर मार लागल्याचे दिसून आले. घटनावेळी मुसळधार पाऊस सुरूअसल्याने संपूर्ण परिसर रक्ताने माखलेला होता.

पोलीस पाटील यांनी तत्काळ विरूर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर विरुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेंद्र गायकवाड आपल्या पोलीस पथक सह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलीस पाटील सचिन बोठे यांच्या तक्रारीवरून आरोपी नितीन गजानन गुरमेट्टीवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम १०३, (३), १
खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात उपपोलीस निरीक्षक शामसुंदर सूर्यवंशी तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *