राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कारसह ₹10.45 लाखांचा मुद्देमाल जप्त

राजुरा : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशाचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ₹10 लाख 45 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जोगापूर फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित स्विफ्ट डिझायर (MH-34 BR-0358) कारची तपासणी केली असता प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोदर कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत ईगल हुक्का शिशा तंबाखूचे 270 पाउच (₹1,12,050), होला हुक्का शिशा तंबाखूचे 400 पाउच (₹1,06,000), रजनीगंधा सुपारीचे 2,700 युनिट (₹27,000) तसेच वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार (₹8 लाख) असा एकूण ₹10,45,050 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रसाद विनेश गुंडवार (वय 33, रा. जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर) व राजेंद्र प्रेमचंद गुप्ता (वय 29, रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 मधील संबंधित कलमान्वये राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 587/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




