
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजालगत पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत तब्बल २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. या अपघातात चंद्रपुरातील वनकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, यात सासू सुनेसह दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. शोभा विनायक वनकर (६३), वृषाली परिणीत वनकर (३१) आणि ओवी परिणीत वनकर (२) अशी मृतकांची नावे आहेत. शोभा वनकर यांचा मुलगा परिणीत हा पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता आहे. चंद्रपुरात ११ जून रोजी नातेवाईकाकडे लग्न असल्याने शोभा वनकर या सून वृषाली आणि नात ओवीसह चंद्रपुरात आले होते, शोभा वनकर या वर्धा येथून विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बसल्या तर, सून वृषाली ही दोन वर्षीय मुलगी ओवीसह यवतमाळ येथून ट्रॅव्हल्समध्ये बसल्याचे •सांगितले जाते. समृद्धी महामार्गाने प्रवास करीत असताना मध्यरात्री सिंदखेडराजालगत पिंपळखुटा येथे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आणि ट्रॅव्हल्सने पेट घेतला. अपघातानंतर काही प्रवासी काचा फोडून सुखरूप बाहेर पडले. मात्र, २५ प्रवाशांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. यातील १२ जणांची शनिवारी दुपारपर्यंत ओळख पटली असून, यात चंद्रपुरातील शोभा वनकर, वृषाली वनकर आणि ओवी वनकर यांची ओळख पटली आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात वनकर कुटुंबीय आणि पृषालीचे नातेवाईक घटनास्थळाकडे स्वाला झाले आहे….




