
महापौर यांना पप्पू देशमुख यांचे जाहीर चर्चा करण्याचे आव्हान
चंद्रपूर : उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता.2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये सौ. राखी कंचर्लावार महापौर असताना सुमारे 200 कोटी रुपयांच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्यामुळे लेखापरीक्षकांनी 71 त्रुटींवर बोट ठेवलेले आहे.चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार याला प्रशासकीय बाब म्हणून जनतेची दिशाभूल करित आहेत व खोट बोलत आहेत. सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून आज जाणीवपूर्वक आमसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्याचे टाळले.तांत्रिक गोष्टीचा गैरफायदा घेऊन ऑनलाइन उपस्थित असलेल्या नगरसेवकांचा आवाज बंद केला व सभा आटोपती घेतली.
पहिल्या इनिंगप्रमाणेच महापौर राखी कंचर्लावार यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भोजन पुरवठा घोटाळा, डबा घोटाळा,कचरा घोटाळा,प्रसिद्धीच्या कामातील घोटाळा असे करोडो रुपयांचे मोठे घोटाळे झाले. त्यांच्या दोन्ही कारकिर्दीमध्ये प्रशासनाकडून करोडो रुपयांच्या कामात भ्रष्टाचार किंवा अनियमितता होणे हा योगायोग आहे का ? याचा अर्थ एक तर त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसावे किंवा त्यांनी प्रशासनासोबत संगनमत करून जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरुपयोग केला असावा.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत नैतिकतेच्या आधारावर महापौर राखी कंचलवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली.



