
दि. ०९-०६-२०१३ रोजी मृतक नामे गजानन पंढरीनाथ गावंडे आपल्या लहान मुलास तहान लागल्याचे कारणावरुन खर्रा खाल्याने थुंकला, तेव्हा आरोपी नामे रमेश उर्फ श्याम पंढरीनाथ गावंडे यास मृतक त्याला पाहुन थुंकला असे वाटल्याने त्याने मृतकचे डोक्यावर कु-हाडीने वार करुन जखमी केले व जिवाने ठार केले. तसेच आरोपी क्र. १ रमेश गावंडे व आ.क्र. २ नामे श्रीमती सुगंधाबाई गावंडे यांनी मृतकची पत्नी नामे सिमा गावंडे (फिर्यादी) हिला सुध्दा कु-हाडीचे दांडयाने मारहाण केली. फिर्यादीचे तक्रारीवरुन दोन्ही आरोपीतांविरुध्द पो.स्टे. अल्लीपूर येथे अप.क्र. ४८/२०१३ कलम ३०२,३०७,३२३,२९४,३४ भादंवि. चा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार सपोनि. श्री.चंद्रशेखर चकाटे यांनी केलेला असुन तपासाअंती दोषारोपपत्र न्यायप्रविष्ट करण्यात आले.
सदर प्रकरणात सुनावणी पुर्ण होवून मा. राजेंद्र मेंढे, सत्र न्यायाधीश, हिंगणघाट यांनी दि. २५-०७-२०२२ रोजी सदर प्रकरणातील आरोपी रमेश गावंडे यास कलम ३०२,३२४,३४ भादंवि. प्रमाणे दोषी ठरवुन आजीवन कारावास व २५,०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ०२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली असुन मृतकचे पत्नीस २०,०००/- रु. नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केलेला आहे. तसेच आ.क्र.२ श्रीमती सुगंधाबाई पंढरीनाथ गावंडे यांना कलम ३२४ भादंवि.अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रु. दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे.
२) आरोपी नामे वसंता बापुन्या कुरझडकर याने त्याची पत्नी सौ शोभा वसंतराव कुरझडकर हिचे चरित्रावर संशय घेवुन तसेच तिने त्याचे विरोधात ३ महिन्यापुर्वी पो.स्टे. आर्वी येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवुन मृतकचे केस पकडुन खाली आपटून तिला निपचित केले व नंतर काचेच्या ग्लासमध्ये मिरची पावडर पाण्यात मिसळुन तिला पाजले. मृतकला श्वास घेता येवू नये म्हणुन तिचे नाक व तोंड दाबुन तिला ठार मारले. चौकशीअंती आरोपीविरुध्द पो.स्टे.आर्वी येथे अप.क्र.५८/१६ कलम ३०२,२०१ भादंवि. चा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोउपनि. श्री.शिवरकर यांनी केलेला असुन तपासाअंती दोषारोप पत्र न्यायप्रविष्ट करण्यात आले.
सदर प्रकरणात सुनावणी पुर्ण होवून मा.श्रीमती आर.व्ही.अदोणे, सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी दि.२५-०७-२०२२ रोजी सदर प्रकरणातील आरोपीस कलम ३०२ भादंवि. प्रमाणे आजीवन कारावास व ३०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ०२ महिने साधा कारावास व कलम २०१ भादंवि. प्रमाणे ०३ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रु. आर्थिक दंड, दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे.




