
• चाळीस वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणधारकांचा सुरू होता संसार
• विरोध करणा-या तिघांना पोलिसांनी केले स्थानबद्ध
चंद्रपूर : मागील ४० वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून शेकडों गोरगरीब कुटूंबांनी संस्कार थाटलेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणधारकांच्या घरांवर बुलडोजर चालवून त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी येथील वेकोली वसाहृतील 17 अतिक्रमणधारकांची घरे जमिनीदोस्त करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तगड्या पोलिस बंदोबस्तात ही कार्यवाही आज मंगळवारी (17 मे) केली. ली आहे. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अतिक्रमणधारकांबाबत बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण काढू नये असे निर्देश दिले होते. परंतु रेल्वेप्रशासनाला मात्र आठवडाभरातच बैठकीत मिळालेल्या निर्देशांचे विसर पडल्याचे या घटनेवरून दिसून आले. भद्रावती तालुक्यातील माजरी परिसरातील वेकोलि वसाहतीत रेल्वेच्या जागेवर मागील 40 वर्षांपासून शेकडो कुटूंबांनी अतिक्रमण करून संसार थाटला आहे.याच घरांमध्ये त्यांचा उदरनिर्वाह अविरतपणे सुरू आहे. मात्र अचानक रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणधारकांना 13 मे पर्यंत घरे खाली करण्याची नोटीस बजावल्याने अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अतिक्रमण धारकांच्या घरांवर बुलडोजर चाविण्याच्या पहिल्या टप्प्यात 17 अतिक्रमण धारकांचा समावेश होता. सदर नोटीस अतिक्रमणधारकांच्या हातात पडताच नोटीसीला विरोध दर्शवत स्थानिक लोकप्रतिनिधी व अतिक्रमण धारकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. माजरीतील व्यापारी संघटना, माजरी संघर्ष समिती व पीडित नागरिकांनी तीन दिवसांपूर्वी शनिवारी (14 मे) रोजी रेल्वे प्रशासनाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचा प्रंचड कडाडून विरोध दर्शविला. रेल्वे प्रशासनाने घरे पडण्याचा निर्णय मागे घ्यावा शेकडो महिला पुरूषांनी रेल्वे रूळावर येऊन निषेघ नोंदविला होता. त्यामुळे रेल्वेप्रशासनाच्या अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाही दरम्यान आर.पी.एफ. जवान व नागरिक आमने-सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. तिन दिवसानंतर आज मंगळवारी (17 मे) ला मात्र रेल्वे प्रशासनाने सकाळी ६ वाजता नागरिकांच्या विरोधाला न जुमानता दोन बुलडोझरच्या सहाय्याने पहिल्या टप्यातील 17 घरांवर बुलडोजर चालविला. अतिक्रमण हटविण्याची कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत राबविण्यात आली. यावेळी रेल्वे पोलीस फोर्स, दंगा नियंत्रण पथक, स्थानिक पोलीस दल, वरोरा, भद्रावती येथील पोलिस कुमक बोलावून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिक्रमणधारकांच्या घरांवर बुलडोजर चालविल्या जात असल्याची माहिती होताच माजी जि.प.सदस्य प्रवीण सूर, राजेश रेवते, उल्हास रत्नपारखी यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम 68 नुसार रेल्वे प्रशासनाची कारवाई पूर्ण होईपर्यंत स्थानबद्ध करून ठेवले. यावेळी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात जवळपास ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळावर येण्यास नापसंती दर्शविली. विशेष म्हणजे यावेळी परिसरात कलम ३७(१) लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घटनास्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र चाळीस वर्षानंतर रेल्वेचा बुलडोजर अतिक्रमण असलेल्या जागेवर चालविण्यात आल्याने अतिक्रमीतधारकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. शेकडो अतिक्रमणधारक बुलडोजर चालल्याने धास्तावले अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारशाह, चंद्रपूर व माजरी परिसरात रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण करून नागरिकांनी आपला संसार थाटला आहे. आज ना उदया रेल्वे प्रशासन आपल्याला निवासी जागा उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा अतिक्रमण धारक कुटूंबियांना होती. परंतु रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्यातील 17 जणांच्या घरांवर थेट बुलडोजर चालविल्याने अतिक्रमध धारक प्रचंड धास्तावले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार सुधीर मुनगंटीवार हे अतिक्रणधारकांचया पाठीसी उभे झाले होते. त्यांनी जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु कोणतीही पर्यायी व्यवस्था न होता रेल्वे प्रशासनाने बुलडोजर चालविल्याने आता संसार कुठे थाटायचा असा प्रश्न शेकडो कुटूंबियांसमोर पडला आहे. येणाऱ्या टप्यात रेल्वे प्रशासनातर्फे घरांवर चालविण्यात येणाऱ्या बुलडोजरमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.




