

संशोधन, पर्यटन, संवर्धन A वईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणीच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रम्हपुरी भूभागातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी ११ वाघ असून वीस वाघ अधिवास क्षमता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांसाठी नवेगाव नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. रामगावकर, व इतर वन विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.



