

आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार सोहळा
चंद्रपूर : प्राचिन काळात महाभारत घडले. त्यात दुर्योधन आणि दुशासनाने कपटीपणाने शकुनीची मदत घेतली आणि लपंडाव करीत जुगाराचा डाव जिंकला होता. तेव्हा द्रोणाचार्य, भिष्म हे सारे हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. आता देशात २०१४ पासून महाभारताची पुनरावृत्ती झाली आहे. देशाचा कारभार अराजकतेच्या दिशेने सुरू असून, भारतीय संविधान संपविण्याचा कट रचला जात असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केली.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने रविवारी १९ फेब्रुवारीला ओम साईराम मंगल कार्यालय येथे आयोजित नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुधाकरराव गोविंदराव अडबाले यांच्या जाहीर सत्कार समारंभात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, स्वागताध्यक्ष म्हणून आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सुनील शेंडे, दौलतराव भोंगळे, ठाकरे, विजयराव बावणे, तुकाराम झाडे, दादाजी लांडे, शंतनू धोटे, गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष सविता कुळमेथे, टेकाम, डाहुले, आनंद चलाख यांची उपस्थिती होती.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले, केंद्रातील सरकार जनविरोधी आहे. त्यामुळे येत्या काळात या सरकारविरोधात रणांगणात उतरावे लागणार आहे. महाभारतात पांडवांचा विजय नेहमी होतो. त्यामुळे या कुरुक्षेत्रात विजयी होण्यासाठी शौर्य, मनगटात ताकद, संयम ठेवावे लागणार आहे. सोबतच श्रीकृष्णासारख्या सारथीचीही आवश्यकता असते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने देशात सुराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूतपणे उभा होत आहे. यापूर्वी केवळ एक आमदार होता. त्यानंतर तीन आमदार, एक खासदार झाले. आता पाच आमदार, एक खासदार झाले आहेत. येत्या २०२४ मध्ये जिल्ह्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वच प्रकारात काँग्रेचाच विजय होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची उत्तम संघटन बांधणी आहे. त्यामुळे हे यश संपादन करता आले. याची देशपातळीवरसुद्धा दखल घेण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने कधीही जाती-पातीचे राजकारण केलेले नाही. त्यामुळे समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक काँग्रेस पक्षाच्या पाठिशी सदैव उभे राहिले आहेत. हे मागील लोकसभा आणि आताच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत दिसून आले. यामुळेच आमदार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे.
यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांचीही समायोचित भाषणे झाली. त्यानंतर आयोजकांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राजुरा विधानसभा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

