चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

घुगुस शहरातील वाढते प्रदूषण नागरिकांसाठी धोकादायक:- राजु झोडे

प्रदूषण आटोक्यात आणा अन्यथा वंचित द्वारा उग्र आंदोलनाचा इशारा

घुग्गुस:- घुगुस शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाते. औद्योगीकरणाच्या नावाने अनेकांनी आपले बस्तान इथे मांडले खरे परंतु वाढत्या प्रदूषणाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे घुगुस शहराचे वातावरण दूषित होऊन शहरातील नागरिकांचे आरोग्य प्रचंड प्रमाणात धोक्यात आले आहे. प्रदूषण तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन दिले.
घुगुस शहर हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर समजल्या जाते. शहरांमध्ये कोळसा खदान, सिमेंट कारखाने व इतर मोठे मोठे उद्योग आहेत. शहराच्या आजूबाजूला कोळसा खदानीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून लोकांना श्वास घ्यायला सुद्धा जड जात आहे. स्वतःला विकासपुरुष म्हणून घेणारे या जिल्ह्यातील आजी माजी पालकमंत्री यांनी येथील नागरिकांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष न देता येथील कंपन्यांनाच मदत केलेली आहे. त्यामुळेच हा परिणाम येथील नागरिकांना भोगावा लागत आहे असा आरोप राजू झोडे यांनी केला? घुगुस शहरांमध्ये सिमेंट फॅक्टरी, लाइट्स मेटल, कोल वाशरीज, कोळसा खाणी, रेल्वे स्लाइडिंग हे प्रदूषणाचे मुख्य केंद्रबिंदू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण व धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. आरोग्याची गैरसोय होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.एवढे सगळे भयंकर व विपरीत परिणाम होत असून भारत सरकार व राज्य सरकार निव्वळ बघ्याची भूमिका करताना दिसत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून घुगुस शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे तरी यावर तात्काळ उपाययोजना करून वाढवलेल्या प्रदूषणाला कमी करावे अशी मागणी राजू झोडे यांनी केली.
घुगुस शहरवासीयांना आरोग्यमुक्त व प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी त्वरित उपाय करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विरोधात उग्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, अमित कुंभारे, हंसराज लांडगे, चायना शेख नूर, भास्कर वडसकर,सपंत कोरडे,बंटी खोबरागड़े तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *