चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

” गोष्ट ऐका पैठणीची ” सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार ; दिग्दर्शक तथा लेखक चंद्रपूर जिल्ह्यातील

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील मूळचे रहिवाशी असलेले शंतनु रोडे दिग्दर्शित  गोष्ट ऐका पैठणीची’  या चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा 68 वा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले आहे. नवरगावसारख्या एका लहानश्या गावातील कलाकाराने मिळविलेले हे यश चंद्रपूर जिल्हासह महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाची बाब ठरली आहे. शंतुन रोडे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारत विद्यालय येथे, तर महाविद्यालयातील शिक्षण याच गावातील ज्ञानेश महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर नागपूर येथे एमए करून ते नेटसेटची परीक्षा उत्तीर्ण केली. नागपूर येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. मात्र, नवरगाव गावातून मिळालेला नाटक कलेचा वारसा मिळालेल्या शंतनु यांना काहीतरी वेगळे करून दाखविण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे यापुढे आपल्या आवडत्या क्षेत्रातच कार्य करण्याचे त्यांनी ठरविले. मागील 15 वर्षापासून ते चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत 12 चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखन केले. तसेच जयजयकार व हनुमान (कार्टुन फिल्म) या चित्रपटाचे ते लेखक, दिग्दर्शक व निर्मातेही राहिले आहेत. त्यांना जयजयकार या चित्रपटासाठी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नवरगाव या गावाने आपल्या बरेच काही दिले आहे. झाडीपट्टीतील नाटकाचा व संगिताचा वारसा या गावामुळेच मला लाभला. गावातील भारत विद्यालय व ज्ञानेश महाविद्यालयातून वाचनाची आवड व सामाजिक द़ृष्टीकोन मला मिळाला, असे शंतनु रोड म्हणाले. पैठणी ही आपली संस्कृती, संस्कार व श्रध्दा यांचे प्रतिनिधीत्व करते. मध्यमवर्गीय वर्गातील स्त्रीच्या स्वप्नाची ही गोष्ट आहे. स्वप्नाचा पाठलाग करताना तिची जी दमछाक होते. या सर्वांवर रचलेली गोष्ट म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट आहे. या चित्रपटातील पात्र वास्तविक जीवनात जगताना मी बघितले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनाला, हदयला भिडणारी अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाशी नक्कीच एकरूप होतील, असाही विश्वास त्यांनी तभाजवळ व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.