राजुऱ्यात पाण्यासाठी भाजपा महिला मोर्चाचा नगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’
*पाच दिवसापासून नळ कोरडे; नगर परिषदेकडून नागरिकांची दिशाभूल

राजुरा : शहरात गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या राजुरा शहरातील महिलांचा संताप अखेर गुरुवारी नगर परिषद भवनात उसळला. डोक्यावर हंडे, हातात निवेदने आणि ओठांवर तीव्र घोषणा घेऊन भाजपा महिला मोर्चाच्या नेतृत्वात नगरपालिकेवर धडक मोर्चा काढत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पंप हाऊस मध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगितले त्यातील दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा बंद असल्याचे कारं सांगून नागरिकांची दिशाभूल केली. मोर्चा पालिका कार्यालयात पोहोचताच महिलांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. “पाच दिवसापासून नळ कोरडे आहेत, कर पूर्ण, आणि पाणी अपूर्ण, आमच्या घरात पाणी कधी येणार?”, “मत मागायला घरोघरी येणारे आता दिसत का नाहीत?” अशा महिलांच्या संतप्त प्रश्नांनी वातावरण तापले होते.
तीव्र उन्हाळा आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाणी नसल्याने नागरिकांचे विशेषत: महिला, लहान मुलं, वृद्धाचे प्रचंड हाल होत आहे. ज्या ठिकाणी अत्यंत कमी दाबाने किंवा काही प्रमाणात पाणी येते ते पाणी दूषित, दुर्गंधीयुक्त असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याविषयाला धरून पाणीपुरवठा अभियंता सुमित खापर्डे यांच्यासमोर महिलांनी थेट आपली कैफियत मांडली. निवडणुकीत लोकप्रतिनिधिनी मोठमोठे आश्वासन दिल्याची आठवण करून देत, “त्या वेळी जोरजोराने भाषण देणारे नगराध्यक्ष आज कुठे आहेत?” असा रोखठोक सवाल महिलांनी उपस्थित केला.
शहरात आधीच अपुरा, दूषित पाणीपुरवठा होत असताना गेल्या काही दिवसांपासून नळांना थेंबही नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांना इतरत्र भटकावे लागत असून जे टँकर येत आहे ते ही अपुरे आहे. मात्र नगरपालिकाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मोर्चाचे नेतृत्व भाजपा शहर अध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री सचिन भोयर, राधेशाम अडानिया, नगरसेवक प्रफुल कावळे, भूपेश मेश्राम, अमोल चिल्लावार, माजी नगर सेविका प्रीती रेकलवार, एड. रजनी बोढे, तेजस्विनी कावळे, किरण भटपल्लीवार यांनी केले.
नगर परिषदेवर हा मोर्चा पोहोचल्यावर ह्या महिलांनी नगर परिषदेसमोर मातीचे मडके फोडून नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला. नगर परिषद अध्यक्ष अरुण धोटे ह्यांच्या विरोधात ह्यावेळी तीव्र निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नगर परिषदच्या वतीने प्रशासकीय अधिकारी वानखेडे ह्यांनी मागरिकांचे निवेदन स्वीकारले आणी पुढील चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. ह्यावेळी सागर भटपल्लीवर. विनोद नरेंदूरवार. राजू वाटेकर. प्रदीप बोबडे. मंगेश श्रीराम. आकाश गंधारे विवेक राठोड. प्रदीप मोरे. गणेश रेकलवार. रवींद्र आत्राम .नितीन सिडाम, रमा आईटलावार, रेश्मा चव्हाण आदीसह शेकडी महिला पुरुषांची उपस्थिती होती.
“पाणी नाही तर कर कशासाठी?”
“जनतेला पाणी द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा!”, “पाच दिवस पाणी बंद नगराध्यक्षाना नाही खंत!” अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून गेला. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, तातडीने चोवीस तासाच्या आत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल. गरज पडल्यास पालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. राजुरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नागरिकांचा संयम आता संपत चालल्याचे चित्र या आंदोलनातून ठळकपणे समोर आले आहे.




