प्रतिनिधी /गडचिरोली :
गडचिरोली जिल्हयाच्या तेलंगाणा सिमेवर दोन वाहनातून २ कोटी २० लाखाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यापैकी १ कोटी २० लाखाची रक्कम नक्षल्यांना देण्यासाठी नेण्यात येत होती या निष्कर्षातून पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. रोकड जप्त प्रकरणात तेंदूपत्ता कंत्राटदार, मॅनेजर व दोन वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी कंत्राटदाराच्या मॅनेजरला पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला १० दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा तपास सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्याकडे देण्यात आला.
नक्षल खंडणीची रक्कम किती याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही
सिरोंचा पोलीसांनी २ कोटी २० लाखाची रक्कम जप्त केली आहे. सदर रक्कम तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांना वितरीत करण्यासाठी नेण्यात येत होती, अशी प्राथमिक माहिती सर्वप्रथम पुढे आली होती. परंतू सदर रक्कम अवैध कृत्यासाठी वापरण्यासाठी नेण्यात येत होती, असा ठपका ठेवून पोलीसांनी सदर रक्कम जप्त केली आहे. या रक्कमेची पोलीस प्रशासनाबरोबरच आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. जप्त केलेलेल्या रक्कमेच्या चौकशीबाबत प्रकरणाचे तपास अधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी नेमकी किती रक्कम नक्षल्यांना देण्यासाठी नेण्यात येत होती, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती दिली. येत्या एक दोन दिवसात याबाबत स्पष्ट होईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी देसाई यांनी सांगितले.


