
सास्ती टाऊनशिप येथे भव्य रॅली व जाहिर सभेचे आयोजन
राजुरा. – वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणार्या सास्ती टाऊनशिप येथे एक मे ला आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य रॅली व जाहिर सभेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता होणार्या या समारोहाला मोठ्या संख्येने कामगार, नागरिक, महिला आणि युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन १ मे कामगार दिन उत्सव समितीने केले आहे. संदर्भात पत्रकार भवन येथे दिनांक २८ एप्रिलला आयोजित पत्रकार परिषदेत समिती पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा घोषित केली. सुमारे १३७ वर्षापूर्वी अमेरिकेच्या शिकागो शहरात दिनांक १ मे १८८६ रोजी कामाचे आठ तास करावे, या मागणीसाठी पाच लाख कामगारांनी शांतीमार्च काढला होता. त्यावेळी तेथील सरकार व जुलुमी उद्योगाच्या मालकांच्या हस्तकांनी जोरदार लाठीहल्ला केला. यात मोठ्या संख्येने कामगार शहीद झाले. यानंतर या आंदोलनाचे लोण सर्व जगभर पसरले आणि शेवटी कामगारांना न्याय्य हक्क मिळाले. या दिनाची आठवण म्हणुन हा १ मे कामगार दिन जगात साजरा केला जातो. सास्ती टाऊनशिप येथे गेल्या ३६ वर्षापासून हा कामगार दिन उत्सवाच्या स्वरुपात साजरा होतो.
या समारोहाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड एन.टी.म्हस्के राहणार असून प्रमुख मार्गदर्शक डॉ.महेश कोपूलवार, हिराचंद बोरकुटे व कामगार नेते विनोद झोडगे उपस्थित राहणार आहेत. यात कामगारांपुढील समस्या, त्यावर कामगारांची भूमिका व उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. समारोहाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दिलीप कनकुलवार, शिरपूरम रामलू, रेवानंद पाटील, पुरुषोत्तम मोहुर्ले, तुळशीराम भोजेकर,लक्ष्मण घुगुल, राजु झोडे, सुनील उरकुडे, रामलिंगु झुपाका, मधुकर ठाकरे, नातारकी, शालिक सोनटक्के, किशोर निब्रड यांचेसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.