
चंद्रपूर : परिस्थिती गरीबीची असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्याला वाघाने ठार केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात केवाडा गावालगतच्या जंगलात घडली आहे. ही घटना आज मंगळवारी (24 मे ) लि सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. 45 वर्षीय पत्नी मिना विकास जांभूळकर या महिलेचा मृतदेह आढळून आला असून पती विकास जांभुळकर (वय 55) याचा मृतदेह अद्यापही मिळालेला नाही. या घटनेने केवाडा व गोंदोंडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. चिमूर तालुक्यातील केवाडा निवासी विकास जांभूळकर यांची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे दरवर्षी ते उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता तोडून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून संसाराला उदरनिर्वाह करतात. यावेळीही सध्या सुरू असलेल्या तेंदूपत्ता तोडण्यासाठी ; आज मंगळवारी ( 24 मे) ला सकाळी 6 वाजताच्या सुमारास पती विकास जांभुळकर व पत्नी मीना जांभुळकर हे दोघेही काही लोकांसोबत तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या कक्ष क्रमांक 34 मध्ये केवाडा गावापासून एक किलोमीटर अंतराच्या परिसरात गेले होते. जंगलात गेल्यानंतर सोबत असलेले काही लोक तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतरत्र विखुरल्या गेले. त्यामुळे हे दोघेही पती-पत्नी तेंदूपत्ता तोडत होते. दरम्यान याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने सर्वप्रथम पत्नीवर हल्ला केला व त्यानंतर पतीवर हल्ला करून दोघांनाही ठार केले. नेहमीप्रमाणे दोघेही पती-पत्नी साडेदहा वाजेपर्यंत तेंदूपत्ता तोडून घरी यायचे. आज साडे अकरा वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत.मात्र इतर सहकारी व्यक्ती घरी परतले त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनी गावालगतच्या एक किमी परिसरातील जंगलात काही व्यक्तींसोबत जाऊन पाहणी केलीअसता कक्ष क्रमांक 34 मध्ये पत्नी मीना जांभूळकरचा मृतदेह आढळून आला. तर मृतदेहापासून पन्नास मीटर परिसरात पतीचा रक्ताने माखलेला चष्मा आढळून आले आहे. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पतीही वाघाच्या हल्ल्यात ठार झाला आहे. सदर घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नेरी वनविभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी रासेकर यांना माहिती देण्यात आली. ते वनरक्षक नागरे व चमूसह घटनास्थळी रवाना झाले. सर्वप्रथम मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनाकरीता चिमूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर स्थानीक पिआरटी चमू व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी कक्ष क्रमांक 34 मध्ये पतीच्या शोर्धात मोहीम राबवली, मात्र दिवसभरात मृतदेह आढळून आलेला नाही. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने शोध मोहीम थाबविण्यात आली. मृतक पती पत्नी हे अत्यंत गरीब परिस्थीतील आहेत. त्यांना दोन मुले, एक मुलगी आहे. परिस्थिती गरिबीची असल्याने रोजीरोटी करून जांभुळकर दाम्पत्य आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होते मात्र वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी जांभुळकर दांपत्य ठार झाल्याने कुटुंब सदस्यांचे छत्र हरपले आहे. तातडीची मदत म्हणून वनविभागाने पंचवीस हजार रुपये मृतकाच्या कुटुंबीयांना दिली. शिवाय भरघोष मदत मदत लवकरच देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. केवाडा व गोदोंडा परिसरातील जंगलात मागील काही दिवसांपासून तीन बछड्यांसह एका वाघिनीचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. याच वाघिणीने जांभूळकर दांपत्याला ठार केल्याचा अनुमान लावल्या जात आहे. पत्नीचा मृतदेह आढळून आलेल्या परिसरात वनविभागाने कॅमेरे लावले असून त्याआधारे वाघाचा आणि बेपत्ता असलेल्या पती विकास जांभुळकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकाच वेळी वाघाने दोघांचा बळी घेतल्याने केवाडा परिसरात प्रचंड दहशत पसरलेली आहे.



