चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन सदर ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतक-यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पाच तालुक्यांचा दौरा केला.
यात भद्रावती, वरोरा, नागभीड, सिंदेवाही आणि मूल या तालुक्यात ई-पीक पाहणीसंदर्भात जिल्हाधिका-यांनी ‘ऑनफिल्ड’ आढावा घेतला. वरोरा तालुक्यात जिल्हाधिका-यांनी सालोरी, पिंपळगाव आणि खांबाडा गावांना भेटी देऊन ई – पीक पाहणीचे प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने-सोळंके, नायब तहसीलदार मधुकर काळे, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच सालोरी येथील सहदेव रामन्ना, पिंपळगाव येथील गणेश ठाकरे आणि खांबाडा येथील शेतकरी रमेश मेश्राम उपस्थित होते.
शेतक-यांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शासनाने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात सर्व शेतकरी बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा. तसेच युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्यास शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. आपल्या गावाची 100 टक्के पीक पाहणी ही ई – पीक पाहणी ॲपवर 30 सप्टेंबर पर्यंत नोंदवून घ्यावी. प्रत्येक शेतक-याने आपल्या पिकांची नोंद स्वत: घेऊन ॲपवर अपलोड करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा प्रश्न असल्यामुळे ज्या मोबाईलचे नेटवर्क आहे, त्याचा उपयोग करावा. एका ॲन्ड्राईड मोबाईलवरून 20 शेतक-यांच्या नोंदी घेता येते, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, तरुण पिढी ॲन्ड्राईड मोबाईलचा वापर करीत असल्यामुळे गावातील तरुणांनी ई-पीक पाहणी करण्यास मदत करावी. विशेष म्हणजे आपल्या आई-वडीलांना या कामात मुलांची मदत मिळेल तसेच त्यांची शेतीशी नाळ जुळविणे शक्य होईल. त्यामुळे गावस्तरीय यंत्रणेने तसेच स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधींनी यासाठी आपल्या गावातील तरुणांना प्रोत्साहित करावे. तलाठ्यांनी या कामी गावातील युवक व युवतीचे स्वतंत्र गट बनवून त्यांच्या मदतीने येत्या 3 दिवसांत जास्तीतजास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.



