जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 3 कोरोनामुक्त
ॲक्टिव रुग्णांची संख्या 39
चंद्रपूर, दि. 31 ऑगस्ट : मंगळवारी (दि.31) जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 642 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 63 झाली आहे. सध्या 39 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 74 हजार 988 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 84 हजार 246 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 861
आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 31 ऑगस्ट : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली व सिंदेवाही या 10 तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांकडून शबरी घरकुल योजनेकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
शबरी घरकुल योजनेचे अर्ज शासकीय आश्रम शाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह तसेच कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत. आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करून अर्जासोबत जातीचे
प्रमाणपत्र, गाव नमुना-8, ग्रामसभेचा ठराव व इतर आवश्यक परिपूर्ण कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावे व शबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 862
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
चंद्रपूर दि. 31 ऑगस्ट : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्याच्या दृष्टीने दि. 3 सप्टेंबर 2021 पुर्वी अर्ज मागविण्यात येत आहे.
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज एकलव्य रेसिडेंशियल स्कूल, शासकीय आश्रम शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तसेच आपल्या नजीकच्या महाविद्यालयांमध्ये व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.



