भद्रावती,दि.24(तालुका प्रतिनिधी)भरधाव जाणारी इंडिका कार पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी होण्याची घटना दि.24 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजे दरम्यान नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भद्रावती शहराजवळ असलेल्या डॉली पेट्रोल पंप जवळ घडली.कोंढा येथील किराणा व्यवसायी स्वप्नील बाबाराव ठावरी (25) हा टाटा इंडिका क्र. MH34 AM0819 ने भद्रावती कडे भरधाव वेगाने येत होता. डॉली पेट्रोल पंम्प जवळ येताच मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या कारला ओव्हरटेक केले. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कार दोन पलट्या खात रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन आदळली. त्यामुळे स्वप्निलच्या हाताला, कमरेला व छातीला मार लागून तो गंभीर जखमी झाला.दरम्यान वरोऱ्यावरून भद्रावतीकडे येणाऱ्या लोकांना सदर अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी कोंढा फाट्यावरील हायवे पोलीसांना माहिती दिली. तसेच स्वप्नील ला गाडीतून बाहेर काढले. स्वप्नीलचा मेहुणा राकेश गोंडे याला माहिती मिळताच त्यांनी गावातल्या लोकांना माहिती दिली. लगेच त्या गावातील गाडी घटनास्थळी बोलावून घेतली व त्याला भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे हलविल्याचे समजते.सदर कार ही कोंढाचे माजी सरपंच अविनाश गोंडे यांची असून काही दिवसांपूर्वी स्वप्नील ला विकल्याचे समजते.




